Kalyangad Fort | Nandgiri Fort – Satara | नांदगिरी गड

Kalyangad Fort कल्याणगड म्हणजेच नांदगिरी गड | Kalyangad fort information in marathi : नांदगिरी किल्ला (Nandgiri Fort) समुद्री सपाटी पासून साधारण ३५३७ फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी.

kalyangad fort

ट्रेकची सुरुवात : नांदगिरी गाव, सातारा,
गडाची श्रेणी : अत्यंत सोपी.
किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ : पावसाळा आणि त्यानंतर जानेवारी पर्यंत.

वर्धनगड किल्ला पूर्ण झाल्या नंतर नांदगिरीच्या दिशेने जाताना, रस्त्याने जात असताना पेरू, डांगबोरं, उसाचा रस असे थांबे घेत घेत कोरेगाव-वाठर रस्त्याने नांदगिरीच्या पायथ्याशी असलेल्या जैन धर्मशाळेपाशी पोचलो, गाडी अर्ध्यापेक्षा जास्त वर जाते या तेथील एका दादांच्या सुचनेने गाडी ऑफरोडिंग ला भिडवली. मातीचा रस्ता, मध्ये आलेले गोटे, बाजूला असलेली दरी, फिरवण्यासाठी जागा असेल की नाही या विवंचनेत एका ठिकाणी लागलेली बोलेरो गाडी बघून आम्ही देखील आमचा रथ तिथे उभा केला. या रस्त्याने जरा जास्तच वेळ घेतला होता.

महिमानगड विषयी वाचायचे असल्यास :

गडी चार आणि गड तीन (महिमानगड, वर्धनगड, नांदगिरी) [भाग-३] [(भाग-) (भाग-२)]

ट्रेकची सुरुवात :

गाडीतून बाहेर उतरलो तेव्हा दोन वाजायला आले होते,त्यामुळे उन्हाची प्रखरता चांगलीच जाणवत होती, हवेतला गारवा आता गरम गरम वाफांच्यात बदलला होता, चटके देणाऱ्या त्या उन्हातून चालताना नकोस होत होतं, आता देखील मातीचाच रस्ता होता, परंतु गाडीची खालची उंची कमी असल्याने गाडी टाकू शकत नव्हतो.

nandgiri fort
Nandgiri | Kalyangad fort

परिणामतः आमची पायगाडी चालू झाली, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात दोन अडीच किमीच अंतर कापून एका कपारवजा गुहेपाशी आलो, बाजूलाच असलेल्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेत विसाव्याला बसलो, इथूनच पुढे किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या, पायऱ्यांच्या बाजूला लावलेलं रेलिंग आणि लगेच लोखंडी गेट लावलेला पहिला महिरपी कमान असलेला दरवाजा.

kalyangad fort

हा दरवाजा ओलांडून पुढे आल्यावर एक वाट डावीकडे खाली उतरते तर दुसरी वर जाते, आम्ही अगोदर वर जाण्याचा निर्णय घेतला, पुन्हा एक दरवाजा ओलांडून मारुती मंदिरापाशी आलो, इथून पायऱ्या चढून किल्ल्याचा माथा गाठला होता.

Nandgiri fort satara
nandgiri | kalyangad fort

वाटेत कल्याणस्वामींच्या समाधीचं स्थान होत.डाव्या बाजूला एक तलाव आणि उजवीकडे एक छोट घर पार करून पुढे आश्रमापाशी सावलीला बसलो असता एक किस्सा झाला.

विनोदी किस्सा :

त्या आश्रमात एक बाबा होते, त्यांना विचारावं किल्ल्याची माहिती म्हणून त्यांच्या कडे गेलो असता ते काहीच बोलले नाही, त्यांनी तोंडावर हात दिला. त्यांचं बहुधा मौन व्रत असावं हे आमच्या ध्यानात यायला जास्त वेळ लागला नाही, इतक्यात बाबांचा फोन वाजला आणि बाबा जे काय बोलायला लागले तर आम्ही चौघे एकमेकांकडे  हसू दाबून बघू लागलो, फोन झाल्यावर बाबा पुन्हा गप्प. पोटात उफळलेल्या हास्याच्या कारंज्यांना आता गप्प बसवत नव्हतं, तिथून काढता पाय घेतला आणि आश्रमाच्या पुढे येऊन दाबून ठेवलेलं हसू खदखदून बाहेर आलं. “अरे यार! बाबांचा नंबर घ्यायला पाहिजे होता, म्हणजे फोन वर त्यांच्याकडून माहिती समजून घेता आली असती” हे कारण आम्हाला  अजून हसवण्यासाठी पुरेस झालं होतं. 

आश्रमाच्या पुढे आलो, जोत्यांचे गवतात हरवलेले अवशेष आणि एका झाडाखाली पीर आणि त्याच्याबाजूला दगडावर कोरलेले तलवारीचे शिल्प पाहायला मिळाले. सगळीकडे गवताचं रान माजलं होत आणि जास्त रहदारी नसल्यामुळे किल्ला एकदम ओसाडच वाटत होता. पुढे असलेल्या पाण्याच्या टाक्यात देखील गाळ भरपूर झाला होता तर छोट्या तलावात इकडून तिकडे नाचणारी बेडके दिसत होती.

दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला थोडा नैऋत्येस वळला आहे, तिथे असलेला बुरुज आणि बुरुजवरील भगवा बावटा जोमाने फडफडत होता, तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळून पावलं मागे फिरवली. ऊन असलं तरी वाऱ्याचे वाहणारे झोत उन्हाची काहिली कमी करत होते.

किल्ल्याचा इतिहास : History Nf nandgiri Fort:

इ.स. ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा भोज (दुसरा ) याने हा किल्ला बांधला असावा अस सातारा येथील ताम्रलेखावरून समजून येते. १६७३ मध्ये सातारा प्रांत काबीज करताना शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्याची नोंद आहे, १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 

किल्ल्याची फेरी :

माथ्यावर आल्यावर जे घर लागलं होतं त्याच्या इथून एक वाट किल्ल्याच्या उत्तरेला जात होती त्या वाटेला लागून उत्तर बुरुज जवळ केला येथे एक नव्यानेच बांधकाम केलेली छोटी वस्तू होती, त्याचे प्रयोजन काय असावे हे कळत नव्हतं, इथूनच समोरच्या डोंगरावर लावलेल्या भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या लक्ष वेधून घेत होत्या.

इथूनच वेडीवाकडी गवतातून वाट काढत मारुती मंदिराच्या वर असलेल्या घुमटाकार वास्तुपाशी आलो, ध्यानधारणेसाठी या वस्तूची निर्मिती होती. गडाचा वरचा माथा सगळा फिरून झाला होता, आता या गडावरील सर्वात प्रेक्षणीय असणाऱ्या भुयाराच्या दिशेने आम्ही वळलो.

पहिल्या दरवाजानंतर वर आल्यावर जी वाट खाली उतरते त्या पायरीमार्गाने खाली उतरून भुयाराच्या तोंडावर आलो. आत पाहिलं असता काळाकुट्ट अंधार, पाण्याने भरलेलं ते भुयार आणि दूर एकदम तेवत असणारा नंदादीप. भुयारातील पाण्याची खोली किती याचा अंदाज नसल्याने शूज वगैरे काढून शॉर्टस घालून टॉर्च घेतली आणि आत प्रवेश केला. थोडंफार पावलं गेल्यावर जाणवलं की खाली दोन मीटर रुंदीचा काँक्रीटचा मार्ग केलाय आणि बाजूला रेलिंग पण लावलेत. उंची देखील बऱ्यापैकी असल्याने वर डोकं लागण्याचा प्रश्न येत नव्हता, त्यामुळे एक गंमत म्हणून टॉर्च बंद करून जो समोर नंदादीप तेवत होता त्याच्या प्रकाशाकडे पाहत हळूहळू सरकू लागलो, कुणीही टॉर्च लावायची नाही असं ठरलं होत.

गडावरील गुहा :

मध्येच पायांना खडी लागत होती.  अंधार इतका होता कि समोर कोण आहे याचा अंदाज देखील येत नव्हता, आवाजावरून फक्त परिचय मिळत होता, लांब दिसणाऱ्या त्या मिणमिणत्या प्रकाशाकडे डोळे किलकिले करून एक एक पाऊल सरकत होतो, त्या काळोखमिट्ट अंधारात चालताना मध्येच एका ठिकाणी रेलिंग संपले, डोक्याचा वर कातळ तर नसेल ना त्यामुळे मध्येच हात वर जायचा, पुन्हा एकदा रेलिंग सुरू झाले, इतक्यात मागून एक ग्रुप आल्याचे आवाज आले, आणि त्यांची टॉर्च चालू झाली, त्यांना लांबूनच आवाज देऊन आमच्या उद्योगाबद्दल सांगून पाच मिनिटे थांबण्यास सांगितलं, त्यांनी देखील आमचं म्हणणं मंजूर केलं. चाचपडत चाचपडत अखेर त्या  भुयारातील प्रकाश स्रोताजवळ पोचलो.

पायांना होणारा थंडगार पाण्याचा स्पर्श, पाण्याचा आवाज आणि समोर तेवणारा नंदादीप एक वेगळीच ऊर्जा त्या भुयारात जाणवत होती, हे सगळं अनुभवत तेथे असलेल्या श्री दत्तात्रेय, पार्श्वनाथ आणि पद्मावती देवीचं मनोभावे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथेच शांत बसलो.

kalyangad fort
१. गुहेत  दुरून तेवणारा नंदादीप २. पाण्यात पडलेले प्रतिबिंब 

मागे थांबलेल्या त्या ग्रुपला आमचं सुख काही बघवल नाही आणि त्यांनी भुयारात प्रवेश करून तेथील शांतता भंग करून आम्हाला पाय काढता घेण्यास भाग पाडलं.

गडउतार होऊन पुन्हा तो मातीचा रस्ता तुडवत गाडीजवळ आलो, एव्हाना भूक भरपूर लागली होती, हर्षल दादाच्या घरून घेतलेल्या तीन चपात्या आणि चुंदा पद्धतशीर पाऊण पाऊण चपाती आणि उरलासुरला सुका खाऊ खाऊन जठराग्नीला धीर दिला होता. घड्याळाच्या काट्याने पाचचा आकडा पार केला होता. एकंदरीत तिन्ही किल्ल्याना पाहिजे असा वेळ देऊन या गडभ्रमंतीला चांगला न्याय दिला होता.

महत्वाची सूचना :

गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x