Maay Marathishi Maze Nate | माय मराठीशी माझे नाते-1
Table of Contents :
माय मराठीशी माझे नाते (Maay Marathishi maze nate) :
‘माय मराठी’ जेव्हा आपण हे शब्द उच्चारतो तेव्हा त्या शब्दातच सर्व आलं. वेगळं असं काय नातं असणार ? माझं आणि मराठीचं हेच नातं आहे मायलेकीचं. माझी मातृभाषा, माझी आई असलेली मराठी मला सर्वाधिक प्रिय आहे. पण मातृभाषा जरी असली तरीही कित्येकदा माणसाला त्यातला गोडवा चाखता येतोच असे नाही. परंतु माझ्या बाबतीत असं झालं नाही कारण मला माझ्या या मायबोलीचा लळा लावणारे म्हणजे माझे बाबा. मराठीशी माझं फुलत जाणारं नातं हे खऱ्या अर्थाने बहरलं ते त्यांच्यामुळेच. बाबांना वाचनाची प्रचंड आवड आणि वाचलेले टिपून घरातल्यांना ते आवर्जून सांगणं हे तर ठरलेलंच. अशावेळी त्यांच्या मुलीने जास्तीत जास्त वाचायला हवं हा आग्रह त्यांनी केला नसता तर नवलचं. त्यामुळे अगदी लहानपणापासून गोष्टींच्या पुस्तकांपासून सुरू झालेला वाचनप्रवास हा अजूनही अविरत सुरूच आहे. (Maay Marathishi maze nate)
वाचनाची गोडी :
बाबांमुळे वाचनाची गोडी तर लागलीच पण त्याचबरोबर मराठी साहित्यक्षेत्राची कवाडं माझ्यासाठी एक-एक करत उघडत गेली. कालांतराने लक्षात आलं की किती अथांग सागर आहे हा ज्ञानाचा पण ते ज्ञान आपल्या मायबोलीतून घेताना जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कशातही नाही. आजवर मी अनेक पुस्तकं वाचली पण मराठीत वाचलेली पुस्तकंच नेहमी जवळून जगता आली आणि अनुभवता आली. हे माझं पक्कं मत झालंय कारण मला माझी मराठी जास्त आपलीशी आणि नसानसांत भिनलेली आहे असं वाटतं. तिच्यासोबत भावना व्यक्त करणं आणि समजून घेणं दोन्हीही जास्त सोपं वाटतं. ती माझी सखी आहे आणि सोबतीसुद्धा. मला आठवतंय लहान असताना बऱ्याचदा मी माझ्या याच सखीद्वारे व्यक्त झालेलं. कधी कविता, लेख लिहून तर खूपदा व्यासपीठ गाजवलंय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांच्या माध्यमांतून.
मराठीशी जोडी :
हीच ती सखी जी सदैव पुस्तकरूपाने माझ्या सोबत होती. तिने कधीही माझा हात सोडला नाही. वेळेस माझी आई होऊन हिनेच मला सांभाळलं, सावरलं, हिंम्मत दिली आणि जगण्याची उर्मी सुद्धा. मला अगदी लहान वयात कोड (पांढरे डाग) झालं. त्यामुळे शाळेत फारश्या मित्रमैत्रिणी नव्हत्याच. मी साहजिकच त्यामुळे कोशात जाऊ लागले हो, ते पण त्याचकाळात शाळेच्या वाचनालयाशी एक घट्ट नातं बनत गेलं.
त्याला कारणीभूत होते आमच्या शाळेचे ग्रंथपाल ज्यांनी माझ्यातली वाचनाची आवड पाहून ती जोपासली आणि त्याला खतपाणी देत माझी वाचनाची क्षुधा वाढवली. त्याकाळी पुस्तके घरी घेऊन जायला परवानगी नसे पण माझ्यासाठी त्यांनी मला ती मुभा दिली. एक पुस्तक ते मला घरी घेऊन जाऊ देत आणि ते संपलं की दुसरं मिळत असे. दुसरं पुस्तकं घेताना ते विचारतं, “बाळा, सांग बर काय वाचलस या अगोदरच्या पुस्तकात?” मग मी त्यांना गोष्टीतला सारांश सांगत असे. त्यांच्यामुळेच कथेतून काय व कसा बोध घ्यावा हे उमगत गेलं. माझ्या जाणीवा वृद्धिंगत केल्या त्या मराठीनेच. पुस्तकं माझे जिवलग बनले आणि माझा एकटेपणा कायमचा दूर झाला तो आजतागायत. या माझ्या मराठीच्या साहित्याचीच ही किमया आहे की आजही मला या जगात अशक्य असं काहीच वाटतं नाही. ती सतत मला प्रेरणा देत असते आणि तिच्याच साथीमुळे मला न्यूनगंडाचा कधी स्पर्शही झालेला नाही.
मराठीचं वैभव :
मराठीचं वैभव काय वर्णावं,”माझा मराठीची बोलू कौतुके।परि अमृतातेहि पैजासी जिंके।ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।” महान संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हंटलेल्या या ओळी अजूनही माझ्या मायबोलीचं वैभव दर्शवतात. मराठीत बोलताना, ऐकताना, वाचताना कमालीचा आपलेपणा जाणवतो कारण ती आपली मातृभाषा आहे. तिच्याठायी अमाप गोडवा आणि वात्सल्य आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलं आज जग जिंकताहेत. हो, याच मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुलं आज अनेक उच्च पदांवर विराजित आहेत पण तरीही माझ्या मायबोलीतून मुलांना शिक्षण न देता इंग्रजी माध्यमांचा पुरस्कार करणारे ही आमचेच लोक आहेत ही खरी शोकांतिका आहे. (Maay Marathishi maze nate)
याच मराठीने आमच्या मातीला कित्येक रत्ने बहाल केली. पु. लं., व. पु., कुसुमाग्रज, साने गुरुजी, दुर्गा भागवत, रणजित देसाई सारखे दिग्गज लेखक आम्हास लाभले. त्यांच्या साहित्याची मेजवानी ग्रहण करता आली किती थोर भाग्य आमचे. याच मराठीत अखंड महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, समंत आसमंतात आमच्या छत्रपतींच्या शिवगर्जना घुमल्या. जनतेच्या ‘जाणत्या राजावर’ अनेक पोवाडे गायले गेले तेहि ह्या मराठीतच. त्यांच्या शौर्याच्या गाथांनी, मराठ्यांच्या बलिदानाने भारून गेलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा गोडवा दौताने लिहिला गेला तो मराठीतच. आमच्या कुलदैवतांवर स्तुतीसुमणे उधळली गेली ती मराठीतच.
नवनवीन कलाविष्कार केले गेले आणि महाराष्ट्राची लोककला जन्माला आली ती मराठीतच. लावणी, वारली नृत्य, नाटिका, बहिरूपी नाट्य, जागरण-गोंधळ, शाहिरी कला, पोवाडे एक ना अनेक लोककलेचे प्रकार फळले, फुलले, नावारूपास आले ते मराठीतच आणि अटकेपार झेंडा रोवून चित्रसृष्टीला अनेकांगी समृद्ध करणारे चित्रपट बनले ते देखील माझ्या माय मराठीतच.
मराठी भाषेची व्याप्ती :
मराठी भाषा वळवावी तशी वळते. हिच्या कित्येक शब्दांचे अनेक अर्थ. मराठीतल्या म्हणी, वाक्प्रचार आम्हाला जीवनाचं सार शिकवतात. सर्वार्थाने समृद्ध करणारी अशी ही माझी भाषा. स्वतःला सिध्द करताना, पटवून देताना आणि समोरच्याला समजून घेतानासुद्धा आपण आधार घेतो तो मराठीचाच. मराठीबद्दल असणारा जिव्हाळा तिच्यासोबत जोडल्या गेलेल्या भावनेमुळे वृद्धिंगत होत जातो आणि कदाचित म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले पोवाडे आजही अनुभवू शकतो, जगू शकतो आणि आजही अंगावर रोमांच फुलवू शकणारी ही शक्ती फक्त आणि फक्त माझ्या माय मराठीतच आहे.
मी मराठी म्हणून जन्माला आले हे मी माझे भाग्य समजते. ज्या मराठीने मला वाढवलं, जिने मला एक सुजाण व्यक्ती बनवलं तिनेच माझ्यातल्या लेखिकेला जन्माला घातलं. अशी ही माझी माय, तिच्या सेवार्थ दोन ओळी लिहिण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल मी सदैव ऋणी असेन.
माय मराठी आई माझी
कशी वर्णू मी तूझी महती
आकंठ बुडाले ज्ञानसागरी
ओढ तुझीच जगावेगळी
तूच तू असाविस सोबती
भीती न कुणाची कधी मज स्पर्शी
अमृतपान्हा पाजतसे अशी
सौंदर्यखाण लावण्यवती
माय मराठी आई माझी….
धन्यवाद!
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची - March 12, 2024
- My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण - February 28, 2024
- Marathi Kavita Prem | Prem Kavita - December 14, 2023