महिमानगड | Mahimangad fort information in marathi

महिमानगड | Mahimangad fort information in marathi :महिमानगड किल्ला (Mahimangad Fort) समुद्री सपाटी पासून साधारण ३२०० फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी. सातारा–फलटण डोंगररांगेतील महिमानगड हा किल्ला म्हणजे ट्रेकर्स साठी पर्वणीच.

..s

गडी चार आणि गड तीन (महिमानगड, वर्धनगड, नांदगिरी)

महिमानगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. सातारा विभागातील अजून पाहण्या सारखे गड म्हणजे नांदगिरी, वरुगड, वर्धनगड. हा ट्रेक शनिवार संध्याकाळ व रविवार या आठवड्या शेवटी करता येतील व एक चांगला अनुभव घेता येईल. आमचा हि महिमानगड-वर्धनगड-नांदगिरी या तीन गडांच्या ट्रेकचा अनुभव मी या लेखामध्ये सांगितला आहे.

भाग-१ : महिमानगड | Mahimangad fort information in marathi :

Mahimangad-Satara
Mahimangad – Satara District

महिमानगड | Mahimangad fort information in marathi : गडकोट भ्रमंती नामक स्वानंदाच्या सुखराशीत लोळताना अशीच चार पाच टोळकी जमवून निघावं एखाद्या दुर्गभ्रमंतीला, जर का ते दुर्ग आडवाटेवरचे असतील अजून छान. अचानक ठरले असतील तर ती भटकंती जबरीच होणार हे निश्चित! कारण ठरवून केलेल्या प्लॅनिंगला इतक्या मांजरी आडव्या येतात न बोललेलंच बरं. माझा मित्र हर्षल (दादा) सोबत बोलता बोलता फोनवरच आम्ही मल्हारगड, पुरंदर, वज्रगड असे एक एक किल्ले ठरवता ठरवता सातारा विभागाकडे वळलो. नांदगिरी, वर्धनगड, महिमानगड हे दुर्गत्रिकूट फायनल केलं. स्वतःची गाडी असेल तर एका दिवसात हे तीन किल्ले फिरून होतात, तरी देखील जास्त वेळ आपल्या हातात असावा या हेतूने रात्रीच नांदगिरीचा पायथा गाठायचं ठरवलं. 

ट्रेकची सुरुवात :

अश्या प्रकारे, मी, हर्षल दादा, प्रिसी आणि सागर असे चार मित्र तीन गडांच्या रपेट साठी निघालो. भरल्या पोटाने बॅग पाठीला मारली आणि सव्वादहाच्या आसपास दादाच घर सोडलं.  दादाची गाडी म्हणजे दादाचा रथ,  रथाचं सारथ्य एकट्या दादावरच होतं. आमची पोटं फुल झाली होती तसच गाडीला देखील फ्युल देऊन तिची टाकी पण फुल केली आणि निघालो. सुरुवातीला ठरवलं होत की नांदगिरीच्या पायथ्याला जाऊ आणि उद्या पुढे जाऊ पण अचानक बदल करून सर्वात शेवटी असलेल्या महिमानगडाच्या पायथ्याला जाऊ म्हणजे उद्या येताना मागे मागे येता येईल आणि तेवढंच अंतर वाचेल. १४० किलोमीटर च अंतर कापताना गप्पांचा मस्त ओघ चालू होता.

NH48 ने चाललेला प्रवास भुईंज वरून डावीकडे वळून सातारा पंढरपूर मार्गावरील कोरेगावला निघून पुसेगाव मार्गे महिमानगडाच्या पायथ्याशी आम्हाला पोचायचं होतं. भुईंज वरून निघून कोरेगावच्या इथे जाताना एका ठिकाणी रस्त्यात एक प्राणी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबला होता. आम्ही जवळ जात असताना तो आम्हाला क्रॉस करून झाडीत घुसला, हर्षल दादा आणि मी एकमेकांकडे बघून “तरस होता ना” , मागून सागर पण “हो, हो तरसच होता”. प्रिसी नेमकी तेव्हा खाली वाकून काहीतरी करत होती, तिने मान वर केली आणि “कुठे, कुठे?” तोपर्यंत तो तरस झाडीत गायब झाला होता. तिला त्याच काही दर्शन झालं नाही.

|Realated : Vardhangad Fort | वर्धनगड (Read more…)

प्रवासातील मजा :

रस्ता सुनसान आणि गाडीचा वेग शंभरीच्या पार असल्याने थांबणं झालंच नाही आणि त्याच तरसाच्या गप्पा मारत प्रिसी ला सगळे तरसवत (त्रास देत) होते. चहाची लागलेली तल्लफ त्या ओसाड सातारा पंढरपूर रस्त्याने कुठेच न भागवल्याने रात्री दीडच्या आसपास महिमानगड गावात पोचलो. संपूर्ण गाव निद्रेच्या स्वाधीन झालं होत. गाडी घेऊन गावातून फेरी मारून परत माघारी फिरून जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या मंदिरात पथारीसाठी जागा पाहून आडवे झालो. जानेवारी महिन्याचे दिवस असल्याने बोचरी नसली तरी बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. कुत्र्यांना देखील थंडीची हुडहुडी भरली होती बहुधा, म्हणूनच की काय आम्ही आल्याची वर्दी गावकऱ्यांना द्यायचा भानगडीत ते काही पडले नाहीत. 

साडेसहाला जाग आली, वातावरणात गारवा असल्याने स्लीपिंग बॅग मधून बाहेर यायची इच्छा नव्हती. काळोखाची दाटी बऱ्यापैकी होतीच, गाव अजून देखील झोपेत होतं, त्यामुळे चहा कुठे भेटेल याची शाश्वती वाटली नाही, मुळात त्यांना सकाळी उठवून त्रास द्यायची इच्छा नव्हती. बाजूच्या घरातून फ्रेश व्हायला आणि जवळच्या बाटल्या पाण्याने भरून घेतल्या सकाळचे सोपस्कर आटपून किल्ल्याकडे प्रस्थान केले.

कृष्णसावळा काळोख विरून आसमंतात निळसर गुलाबी शेंदरी छटा उमटायला सुरुवात झाली होती.

Mahimangad fort information in marathi
महिमान गडावरची पहाट

महिमानगड Mahimangad fort information in marathi :

गडावर जाण्याची सुरुवात :

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वरच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या इथून मार्ग जातो हे माहीत होत. तेवढ्यात सकाळचा विधी उरकायला गेलेल्या दोन मुलांना आवाज देऊन त्यांना वाटेची पुष्टी विचारली. त्या मुलांनी वाटेला लावून दिल्यावर,खुरट्या झाडीतून वाट काढत मुरमाड भाग आणि नंतर मोडकळीस आलेल्या पायरी मार्गाने  महिमानगडाच्या दरवाजापाशी पोचलो. इथवर पोचायला अवघा वीस मिनिटांचा अवधी लागला होता. मोडकळीस येऊन अखेरच्या घटका मोजत असलेला दरवाजा तिथे असलेले गजशिल्प आणि दरवाजाचे तुटलेले भाग तिथेच पडलेले बघून खिन्न झालेले मन पुढची वाट चालू लागले.

Mahimangad fort information in marathi

दरवाजाच्या इथे एक भग्न झालेली गणेशमूर्ती आहे अस वाचनात आलं होतं पण ती काही नजरेस दिसली नाही. दरवाजा पडला असला तरी तटबंदी मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत होती. दरवाजातून प्रवेश केल्यावर उजवीकडची तटबंदी बघून डाव्या बाजूला वळून टेपाड चढून किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या मारुती मंदिरापाशी येऊन पोचलो.अंजनी सुताच ते जीर्णोद्धारीत मंदिर समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमुळे संपूर्ण किल्ल्यावर एकमात्र सावलीच ठिकाण.

Mahimangad fort information in marathi

आम्ही एकदम प्रातःकाळी आल्याने सूर्यनारायण अजून त्यांचा आळस झटकत होते, त्याची ती वलयं सृष्टीला जागे करण्यात चांगलीच विलोभनीय वाटत होती. 

मधेमध्ये तुटलेले तटबंदीचे अवशेष आणि गडाच्या आजूबाजूचा प्रदेश बघत बघत गडावर असलेले पडक्या जोत्याचे अवशेष आणि एक खोली होती, त्यात पीराचे थडगे होते. पिराच्या पुढेच दगडांचा चौथरा रचून ध्वजस्तंभ केलेला त्यावर फडकणारा भगवा आणि समोर सुर्यनारायणाने केलेली रंगांची उधळण, त्याच्यासवे सोनेरी किनार घेऊन नाचत आलेले पांढरे ढग तर सावळ्या ढगांआडून लपाछपी खेळत वर येणारा तांबूस गोळा. एक फोटो तो इधर बनता है! या अविर्भावात धावतच जाऊन पोझ दिली, खाली असलेला फोटो पहाच.

Mahimangad fort information in marathi

महिमानगडाने दिलेल्या या अफलातून नजराण्याने पाय तिथेच रोवून ठेवण्यास भाग पडले आणि काही क्षण तो सोहळा अनुभवत इतिहासाची पाने उलगडण्यात हरवून गेलो.

किल्ल्याचा इतिहास :

(History of Fort/ Kalyangad ) : महिमानगड | Mahimangad fort information in marathi : आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर – पंढरपूर – सातारा – वाई – महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड.

आम्ही पुन्हा आमची पुढची वाट धरली बाजूला असलेल एक सुकलेल तलाव वाट तटबंदीत असलेल्या चोर दरवाजाने बाहेर निघून ईशान्येकडे असलेल्या सोंडेवर घेऊन आली. चोर दरवाजातून बाहेर पडताना त्या छोटेखानी आयताकृती दरवाजातून समोर नजरेच्या टप्प्यात उठवलेला लालेलाल गोळा आणि दूर एका जलाशयात त्याचं पडलेले प्रतिबिंब पाहून अंजनीसुत हनुमंताला याला खाण्याचा मोह का झाला असावा हे या एकंदरीत दृष्यावरून मनोमन पटत होते.

Mahaimangad-Satara Maharashtra forts

दरवाजातून बाहेर पडल्यावर त्या धावत गेलेल्या सोंडेला पादाक्रांत करत शेवटी असलेल्या बुरुजाकडे जाताना मागे वळून पाहिलं असता, सोंडेच्या तटबंदीच्या अलीकडे असलेला भगवा, मगाशी पाहिला तो भगवा आणि उत्तरेकडे तटबंदीवर असलेला पिवळा बावटा जणू काही एका विजयी मुद्रेने फडकत होते.

Mahimangad fort information in marathi

अर्धीआधिक गडफेरी उरकली होती. फोटोंचा थोडा(फार) बाजार उठवून पिकवलेला हशा कधी त्या फोटोत अडकला, कळलं देखील नाही.

गडावरील पाहण्याची ठिकाणे :

सोंडेवरच्या त्या तटबंदीत अजुन एक दरवाजा आहे ज्याचे दगड ढासळलेत आणि गवताचं रान माजलेल असल्याने जास्त कोणी तिकडे फिरकत नसावं, त्यातूनच वाट काढत आम्ही पुन्हा तटबंदीच्या आत प्रवेश केला.

Mahaimangad-Satara Maharashtra forts

इथे तटबंदी देखील बऱ्यापैकी ढासळली होती. त्यातून मार्ग काढत पुढे आलो. गडावर लावलेल्या झाडांचे खुंटे आणि त्याला नव्यानेच आलेली पालवी बघून त्या प्रत्येक खुंट्याखाली दगड रचून आणि माती ओली दिसल्याने नित्यनेमाने हे व्रत कोणीतरी जोपासतंय त्याला शतशः नमन करून पुढे निघालो. महिमानगडावर असलेलं उत्तम स्थितीतलं बांधीव तळं आम्ही शोधत होतो आणि आमची शोधमोहीम संपल्याचा प्रत्यय हे दृश्य पाहून येईल.

Mahaimangad-Satara Maharashtra forts

महिमानगड | Mahimangad fort information in marathi :

तटबंदीत वाढलेले वृक्ष आणि त्यामुळे काही ठिकाणी रया गेलेली तटबंदी हे सगळं असलं तरी या सुस्थितीत असलेल्या तलावाने गडाचं गडपण जपण्याचे केलेले यत्न दिसत होते. तासाभरात गडफेरी पूर्ण करून पावले दरवाजाजवळ येऊन खाली महिमानगड गावाचा अंदाज घेत गावाच्या रोखीने निघाली, मोजकी लोकवस्ती, हिरवीगार शिवारं, मातीचा रस्ता आणि महिमानगडाचा वरदहस्त याने गाव समृद्ध झालं होतं.

Mahaimangad-Satara Maharashtra forts

मंदिराजवळ आलो, पाणी दिलं त्या माऊलीला आवाज देऊन गावाचा निरोप घेतला आणि गाडीत येऊन पुढच्या टप्प्याच्या रोखीने निघालो.

क्रमशा : भाग-२ ……

  1. माय मराठीशी माझे नाते
  2. गुढी पाडवा २०२१

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

marathirang.com
विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x