Marathi Patra Lekhan | वसुंधरेस पत्र

वसुंधरेस पत्रलेखन | Marathi Patra Lekhan :

Marathi Patra Lekhan : कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांवर आलेली परिस्थिती आणि संबंध जगावर आलेल्या संकट, यामुळे आपल्याच घरात बंदिस्त झालेले आपण. या सर्वांची माफी म्हणून वसुंधरेस (पृथ्वीस) लिहिलेलं हे पत्र आणि केलेल्या अपराधांची कबुली.

मुक्काम, पो. मराठी रंग,
दि. ०७/०५/२०२१

प्रिय वसुंधरेस,
सा.न.वि.वि

                   पत्रास कारण की तुझ्याशी संवाद साधून खुप वर्षे सरली. या गतवर्षांत तुझी विशेष आठवण झालीच नाही बहुतेक. आज एक हतबल मानवाकडून तुला पत्र लिहिलं जातंय. जो तुझ्या शक्तीपूढे नतमस्तक झालाय. हो मला कळून चुकलंय तुझ्या निसर्गाच्या शक्तीपूढे मी एक कस्पटासमान आहे.आज संकटकाळी तू आठवते आहेस आणि त्याचबरोबर मी केलेली कृत्य ही आठवताहेत. तुझ्यावर केलेले अनन्वित अत्याचार आठवताहेत, तुझी अवहेलना आठवतीये, तुझी लाचारी आठवतेय आणि तुझी सहनशीलता ही आठवतेय.

इतके वर्ष सारं सोसलसं तरीही नेहमी मुक्तहस्ताने देत राहिलीस पण तुझं दैवत्व दिसलंच नाही मला कधी. सतत स्वार्थीपणे वागत राहिलो. हा ही विचार नाही केला की तुझ्यावर फक्त माझा हक्क नाही तर सर्व प्राणिमात्रांचा आहे. तुझ्यावर फक्त माझी मक्तेदारी असल्यासारखा तुझा उपभोग घेत गेलो एकट्याने. कोणाचाही, कशाचाही विचार न करता फक्त वापरत गेलो तुला, तुझ्या संसाधनांना. सतत प्रदुषित करत गेलो तुला. स्वतःचा सर्व कचरा तुझ्यात ओतला. तुला दूषित करूनही मी थांबलो नाही तर तुझ्या पोटात शिरून आहे नाही ते सर्व बाहेर उकरून काढलं. माणिक मोती, सोनंनाणं तर सोडाच पण खनिज, धातू सर्व घेऊन लुटलं तुला. माझी तृष्णा कधी भागलीच नाही. लूट लूट लुटूनही कधी गरज संपलीच नाही.

marathi patra lekhan
Marathi Rang

                   कधी कळलंच नाही मला की मी तुला नाही स्वतःला लुटतोय. स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या आयुष्याशी खेळतोय. किती सुंदर होतीस तू. सर्व ग्रहांत शोभून दिसणारी. स्वर्गाचं प्रतिरूप मानलं जायचं तुला. देवाधिकांनी महत प्रयासाने घडवले तुला. साक्षात ईश्वराने वास करावा इतकं तुझं पावित्र्य. त्यांनाही तुझा मोह आवरला नाही आणि दशावताराच्या रूपाने त्यांनीही जन्म घेतला तुझ्या भूमीवर. अशी तुझी दिव्य भूमी पण माझ्या स्वार्थापोटी कोणाच्याच राहण्यालायक नाही ठेवले मी तीला. आज माझ्या पापांचा घडा भरलाय आणि तुझ्या सहनशक्तीची सीमा संपलीये. कोरोना तर फक्त निम्मित आहे.

मला कळून चुकलंय की हे सर्व माझ्याच कर्माचं फळ आहे. लोकसंख्या हा सर्वांत मोठा यक्षप्रश्न आहे सर्व जगातल्या सरकारांपुढे पण इतके वर्ष तुझ्यावरचा भार या लोकसंख्येमुळेच वाढतोय हे कळलंच नाही मला कधी. कधी न थांबणारा मी अन माझं जग आज कुठे थांबलोय पण अंतर्मुख होण्यासाठी हा असा दिवस यावा हे खरं माझं दुर्दैव. आज घराच्या खिडकीतून डोकावल्यावर निळंशार – निरभ्र आभाळ दिसतंय, मोकळी स्वच्छ हवा खेळतीये तेव्हा मला मी आजवर केलेल्या प्रदूषणाची जाणीव व्हावी ही खरी शोकांतिका. का आजवर नाही जाणवलं मला मी केलेलं प्रदूषण? का आजवर नाही लागलं मनाला मुक्या प्राण्यांचे अस्ताव्यस्त जीवन? स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना-पक्ष्यांना डांबून ठेवणारा मी आज का मला त्यांचं दुःख जवळून जाणवतंय? मला ही घरात कोंडून राहावं लागतंय म्हणून? की आज कळतंय इतके वर्ष त्यांचा जन्मसिद्ध हक्क आपण मारत आलोय म्हणून? अरे माणूस म्हणून जन्माला आलो याचा सतत बडेजाव मिरवत आलो मी पण मी काही ईश्वर नाही हेच विसरून बसलो.

                 मानवास काही अशक्य नाही, मी म्हणजे या जगाचा राजा हा तोरा आता पूर्ण विरलाय कारण मला कळलंय की तू या जगाची खरी स्वामिनी आहेस. आमच्या सर्वांची माय आहेस. आजवर मला सांभाळलंस पण मी मात्र माझ्याच जगण्यात मश्गूल होतो. तू भक्कम उभी होतीस माझ्यासाठी म्हणून सर्व आलबेल होतं पण मी ते जाणून घेण्याची कधी तसदीच घेतली नाही. तुला इतकं अस्वच्छ केलं की नाही नाही त्या विषारी जीवजंतूंना तुझ्या उदरात प्रवेश मिळता झाला. हो मला मान्य आहे याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे पण वसुंधरे मला यातून बाहेर पडायचयं. पुन्हा तुझ्या अंगाखांद्यावर मुक्तपणे बागडायचयं आणि आता यापुढे तुला व सर्व प्राणीमात्रांना माझ्याकडून त्रास होणार नाही याची मी ग्वाही देतो. मला यातून मोकळा कर. तुला आणि फक्त तुलाच हे शक्य आहे.  मी केलेल्या पापांचं फळ या जगाच्या विनाशाचं कारण बनू नये. तसही तू पाहिलं असशीलच या संकटामुळे घरचे लोक एकमेकांच्या जास्त जवळ येताहेत.

वाईटातून चांगलं म्हणतात ते हेच असावं बहुतेक. एका हॉस्टेलरूम सारखं वाटणाऱ्या घराला आता घरपण येतंय. थोड्यावेळासाठी का होईना मोबाईल फोन बाजूला ठेवून कुटुंबासोबत सापशिडीचा डाव रंगतोय. आजीआजोबा आणि नातवंड मिळून कॅरम खेळताहेत तर कुठे सर्व मिळून प्राणायाम शिकताहेत. या कोरोनाने भयभीत तर नक्की केलंय. माणसांना वास्तविक शरीराने दूर केलं असलं तरी मनाने जवळ आणलंय. या संकटाच्या निमित्ताने तू हे दाखवलंस की प्रेम आणि निस्वार्थ सेवाच जगात चिरकाळ टिकतं. हे वसुंधरे, तुला एकचं विनवणी या कठीण काळात तू आमची ताकद बन. आम्ही तुला पुन्हा स्वच्छ करू. तुला पुन्हा रूपवान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण बनवू. वृक्षारोपण करू, जलसंपदा जपून वापरु त्याचं जतन करू, यापुढे या विश्वाचा एक जबाबदार घटक म्हणून क्रियाशील राहू. तुझं आणि तुझ्यावरील जीवसृष्टीच संवर्धन करू. फक्त एकदा तू मायेचा हात मस्तकी ठेव. मग बघ हे संकट कसं दूर पळून जाईल.                

चुकभुल माफ असावी. आजवर केलेल्या कृत्यांची क्षमा असावी. सतत तुझी मायेची ऊब सोबत असावी हीच आशा.

तुझा प्रेमाभिलाशी, एक क्षुद्र मनुष्य

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Know more about marathi patra lekhan, vasundhares patra, pruthvis patra

marathirang.com
प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x