Vardhangad Fort | वर्धनगड

वर्धनगड | Vardhangad Fort information in marathi : वर्धनगड किल्ला (Vardhangad Fort) समुद्री सपाटी पासून साधारण १५०० फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी. सातारा–कोरेगाव-खटाव डोंगररांगेतील वर्धनगड हा किल्ला म्हणजे ट्रेकर्स साठी सोप्या श्रेणीतीलच आहे.

ट्रेकची सुरुवात : वर्धनगड गाव, तालुका – खटाव,
गडाची श्रेणी : अत्यंत सोपी.
किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ : पावसाळा आणि त्यानंतर जानेवारी पर्यंत.

महिमानगड विषयी वाचायचे असल्यास :

गडी चार आणि गड तीन (महिमानगड, वर्धनगड, नांदगिरी) [भाग-२]

महिमानगड नंतर आता वर्धनगड | Vardhangad Fort, नाही नाही, तो तर आहेच!  पण त्याही अगोदर पोटोबा! महिमानगड करताना सोबत नेलेला सुका खाऊ देखील खाल्ला नव्हता जेमतेम पाण्याचा घोट घेतला असणार. पण आता पोटेश्वर देवतेला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुढचा मार्ग सुकर होणार नाही, हे सर्व जाणून होतो.  महिमानगड ते वर्धनगड हे २२ किमीच अंतर त्याच्यात आता रस्त्याच्या बाजूच हॉटेल शोधणं हे आमचं टास्क होतं. महिमानगड गावातून बाहेर निघालो आणि पंढरपूर सातारा रस्त्याला लागलो तोच रस्त्याच्या बाजूला एक छोटी टपरी उघडली होती, त्याची सगळी सामानाची मांडामांडी चालू होती.

वर्धनगड Vardhangad Fort

नाश्त्याला काय आहे विचारलं असता म्हणाला, “तेल आता ठेवलंय गॅस वर, चहा तयार आहे”. चहा तर आपला जीव की प्राण, माझा चेहरा लगेच “अरे काय बोलतोस!” असाच झाला होता. गरमगरम चहाचे घोट तर नरड्याखाली उतरणार म्हणून गाडी साईडला घेऊन टेबलाजवळ आम्ही बैठक मांडली देखील. रस्त्यापासून अवघ्या पाच-सहा फुटांवर  असलेल्या टेबलावर बसताना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे दुर्लक्ष करून चहा बिस्कीट खाताना बिस्किटांच्या जागी कधी खाऱ्या आल्या आणि चहाचे दुसरे कप आले, पोटेश्वरापुढे आता सार काही माफ होत.

एक एक चहाचा कप झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. तोवर तेलाने चिंब भिजलेल्या मोठ्या मोठ्या भजींच्या प्लेट्स लागल्या. चहामध्ये खारी खाताना अक्षरशः सारी लाज सोडून चहात खारी बुडवून त्याची खीर करून बोटाने वरपण्यात काय मजा होती, अहाहा! (इतक्या महिन्यांनी ब्लॉग लिहिताना देखील जीभ वळवलायला लागली) पुन्हा एक एक चहाचा कप झाला. या सगळ्या धुंदीत जर का एखादा ट्रक रस्ता सोडून आमच्या दिशेने आला असता तर आमच्या पाट्या तिथे नक्की असत्या हे मात्र नक्की. सकाळपासून उपाशी गाड्यांना आता तरतरी आली होती.

वर्धनगड गाव :

गाडी पुन्हा निघाली, सातारा पंढरपूर मार्गावरील पुसेगाव सोडलं आणि वर्धनगडाच्या वेशीवर दाखल झालीदेखील. सातारा जिल्ह्यातील या किल्ल्यांना सरळसोट डोंगररांग नसल्याने मध्येच कुठेतरी उठवलेल्या डोंगरांवर हे किल्ले बांधले आहेत त्यामुळे बहुतेक सारे किल्ले हे सुटसुटीतच आहेत. रामेश्वर डोंगराच्या बाजूला असेलेला हा वर्धनगड | Vardhangad Fort देखील असाच एक, रस्त्यावरून जाताना त्याचं ते उठावदार दृष्य त्याची एकसलग तटबंदी आणि बुरुजांमुळे हा एक किल्ला आहे हे आपल्याला दुरूनच समजते, वर्धनीमातेचे मंदिर देखील दुरूनच दृष्टिपथात आले, जे खूप प्रसिद्ध देखील आहे.

वर्धनगड Vardhangad Fort

वर्धनगड गावाच्या वेशीवरच जिथे गावात शिरतो तिथे दोन तोफा ठेवण्यात आल्या आहेत, ग्रामपंचायत किल्ले वर्धनगड अस लिहिलेली कमान आपल्या स्वागताला उभीच असते. गावात शिरताच गडाकडे जायचा रस्ता विचारत एका जुन्या पडक्या कुलूपबंद घराशेजारी गाडी लावली, बॅग पाठीला मारली आणि किल्ल्याच्या दिशेने निघालो. वाटेला लागलो आणि जरा चुकल्याचुकल्या सारखं झालं. गडाची पूर्ण वाट सिमेंटच्या पायऱ्यांनी साकारली होती, त्यात काही ठिकाणी सलग प्रत्येक पायरीवर देणगीदाराच्या नावाची पाटी लावली होती, काही ठिकाणी काम चालू होतं. काटे दहा च्या  पुढे सरकले असल्याने उन्हाची तिरीप जाणवत होती आणि पायाखालच काँक्रीट देखील तापायला लागलं होत.

पूर्ण चढावर एका ठिकाणी असलेलं चिंचेच झाड तेवढी काय ती सावलीची जागा, त्याच्या अलीकडे सावलीसाठी एक झोपडीवजा शेड उभी केली आहे. गावातून दरवाजापर्यंत जायला वीस मिनिटेच लागली पण तोवर अंग चांगलच शेकून निघालं होत, अक्षरशः घाम निघालं होतं.गोमुखी बांधणीचं पुर्वाभिमुख महाद्वार, बाजूचे सुस्थितीत असलेले बुरुज आणि त्यापासून निघालेली एकसंध तटबंदी, दरवाजातच दोन क्षण विसावून पुढे निघालो इतक्यात खालच्याच गावातील एक महिला आपल्या लेकरास घेऊन गडदेवता वर्धनीमातेच्या दर्शनासाठी आली होती. 

वर्धनगड Vardhangad Fort
दरवाजाच्या अलीकडेच काँक्रीटच्या पायऱ्या संपल्या होत्या त्यामुळे दरवाजात येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार झोतांमुळे हायसं वाटत होतं. 

दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करताच समोर दिमाखदार भगवा फडकत होता, तटबंदीच्या थोडं पुढेच गवताचं आणि झाडीचं रान माजल असल्या कारणाने मळलेली जी मूळ वाट आहे त्याच वाटेने वर निघालो, मध्येमध्ये असणाऱ्या दगडाच्या पायऱ्या चढावरच असणाऱ्या शिवमंदिर ज्याचं जुन्या दगडी बांधकामावर प्लास्टर करून जीर्णोद्धार करण्याचं काम चालू होतं. बाजूलाच असलेल टाकं, सावलीला विसावलेली काही लोक आणि काही घोडीही होती.

थोड्याच पुढे मारुतीचं मंदिर होतं. मारुतीरायाला नमन करून झाडीतून बाहेर आल्यावर वर्धनगडाची अधिष्ठात्री वर्धनी मातेच मंदिर नजरेत दिसत होतं. गडावरचे हेच मंदिर दुरून देखील चांगलं नजरेत येत होतं. मंदिराच बांधकाम नवीनच दिसत होतं, तर बाहेरच्या भागात फरशी बसवण्याचं काम चालू होतं. नवसाला पावणाऱ्या वर्धनीमातेच्या दर्शनाला आजूबाजूच्या परिसरातील भाविक येतात, त्यामुळे येथे कायमस्वरूपी पुजारी असतात.

वर्धनगड Vardhangad Fort
(वर्धनगड | Vardhangad Fort) – गडफेरी :

मंदिराचे सभामंडप एकदम प्रशस्त आहे, एक गावकरी पुजाऱ्याच्या मदतीने पूजा मांडत होता, त्याने आणलेल्या केळीच्या फण्याकडे आम्हा सर्वांचं लक्ष लागलं होतं, परंतु पूजा झाल्याशिवाय काही मिळणार नाही, म्हणून देवीजवळच्या ताटातील प्रसाद घेऊन गडफेरीला सुरुवात केली.  किल्ल्याच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडच्या तटबंदीत एक चोरदरवाजा आहे तोच पहिला बघून घेऊ म्हणून मंदिराच्या टेपाडावरून खाली तटबंदीच्या इकडे येऊन तो दरवाजा शोधू लागलो, तटबंदी धरून चालत गेल्यावर हा दरवाजा लगेच दिसतो. मातीने पूर्ण गाडून गेलेल्या त्या चोरदरवाजाला शिवदुर्गेश्वर दुर्ग संवर्धन संघटनेने श्रमदान करून नवसंजीवनी दिली, यासारखीच अनेक कामे या संस्थेने गडावर केली आहेत. अश्या संघटनांना मनाचा मुजरा. चोरदरवाजाच्या पायऱ्या उतरून आपण तटबंदी च्या बाहेर येतो, दरवाजात येणारे भर्राट वाऱ्याचे झोत स्तब्ध उभे राहू देत नव्हते. 

वर्धनगड Vardhangad Fort

पुन्हा माघारी फिरून तटबंदीवरून चाल धरली इथून दिसणारे दृश्य खरंच खास होते, खाली दिसणारं वर्धनगड गाव आणि लागून असलेला सातारा पंढरपूर मार्ग पंढरपूरच्या दिशेने पाहिलं असता सरळसोट जणू काही निर्वातात गेलाय, असाच भास होत होता, स्वर्गाची वाटच जणू!  खरंच खूप सुंदर दृश्य होतं ते.

वर्धनगड Vardhangad Fort

तटबंदी वरून चालताना काही ठिकाणी तटबंदी किंवा बुरुज ढासळले होते तर काही ठिकणी एकदम उत्तम स्थितीत होते, वर खाली वर खाली अशी पायमोडी गाडी पाण्याच्या टाक्यांच्या इथे आली. अमृताचे हे घट जणू काही नुसती तहान नाही भागवत तर एक नवचेतना देतात, या रहाळग्यात येणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येण्यास उद्विग्न करतात. काठोकाठ ओतप्रोत भरलेल्या त्या टाक्यांतील थंडगार पाण्याचा एक एक घोट अंतरात्मा सुखावत होते. काही अंतरावर अजून दोन टाके लागले, या टाक्यांच्या बाजूला असलेला मातीचा ढिगारा पाहून मागच्याच वर्षी हे टाकं श्रमदान करून पुनर्जीवित केल्याचं दिसून आलं.

चालता चालता पश्चिम बुरुजावर पोचलो देखील. इथे देखील इक ध्वजस्तंभ होता तर दूरवर नजर भिरकावताना दूरवर पसरलेला सपाट मैदानी प्रदेश मध्ये मध्ये दिसणारी गावं, त्या गावांच्या बाजूला असलेली हिरवी पिवळी शेत-शिवारं तर मध्ये मध्ये माना वर काढू पाहणारे छोटे मोठे डोंगर. हे सर्व पाहताना नजर तोकडी पडत होती. हे सर्व पाहत असताना मग्न झालो आणि इतिहासात गेलो.

किल्ल्याचा इतिहास (History of the fort ) :

अफजलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला तसेच १६६१ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महाराजांनी या गडावर वास्तव्य देखील केलं होतं. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जेव्हा औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा या किल्ल्यावर देखील मुघल सरदार फत्तेउल्लाखानाने चाल करून गेला. या धुमश्चक्रीत आजूबाजूच्या गावातील लोकांनी किल्ल्यात आश्रय घेतला होता. खान किल्ल्याला वेढा घालू शकतो म्हणून त्यावेळी वर्धनगडाच्या किल्लेदाराने एक शक्कल लढवली, ९ जून १७०१ रोजी आपल्या वकिलाला फत्तेउल्लाखानाकडे पाठवून “किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे” असे सांगितले, या गोष्टीला खान राजी झाला.

खरंतर किल्लेदाराने इथे वेळकाढूपणा केला होता, आणि माणसांची जमवाजमव केली होती. किल्लेदार आज येईल उद्या येईल शेवटी खानाला मराठ्यांचा डाव समजला त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूचे बरेच सैन्य मारले गेले, ४० मराठी सैन्याना कैद झाली. मोगलांनी आजूबाजूच्या परिसरातील गावात जाळपोळ केली. अखेर १९ जून १७०१ या दिवशी मराठ्यांनी गड सोडला.

मुघलांनी गडावरील सारी मालमत्ता जप्त करून “सादिकगड” अस किल्ल्याच नामकरण केलं. तीन वर्ष किल्ला मोघलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला, ऑक्टोबत महिन्यात लगेच मोघलांनी किल्ल्यावर वर्चस्व मिळवलं. १७०७ मध्ये किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकला, १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, इतिहासाची सोनेरी झालर लागलेल्या किल्ल्यावर आज आपण आहोत या विचाराने सार अंग शहारून गेलं होतं. शिवरायांच्या मायेचा स्पर्श अनुभवत होतो, सुखद आणि भावुक क्षण होते ते.

उर्वरित गडफेरी :

उर्वरित गडफेरी करताना तटबंदीत असलेलं सुस्थितील शौचालय दिसलं, त्याच्या पुढेच उजव्या अंगाला एक तलाव देखील होता, इथे आसपास तोफ आहे अस वाचलं होतं पण ती तोफ काही दिसली नाही, संपूर्ण गडफेरी होऊन दरवाजाजवळ पोचलो, तेवढ्यात खालच्या कुठल्या तरी गावातून आलेल्या पोरांना तोफेबद्दल विचारलं असता त्यांना देखील कुठे आहे ते माहीत नव्हतं, मात्र त्यातील एकाने झाडीत असलेले दगडाचं गोल जात दाखवलं. बहुतांश किल्ल्यावर अशाप्रकारचे जाते आढळते. किल्ल्याचे बांधकाम करताना चुन्याची पावडर करण्यासाठी यांचा उपयोग व्हायचा.

वर्धनगड Vardhangad Fort

एकंदरीत दोन तासात गडफेरी होऊन दरवाजा ओलांडला आणि पायथा जवळ केला. आता पुढचा टप्पा कल्याणगड उर्फ नांदगिरीचा किल्ला.

क्रमशा : भाग-३ ……

  1. महिमानगड | Mahimangad fort

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

marathirang.com
विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

4 Comments
Inline Feedbacks
View all comments
Amit
Amit
3 years ago

Thanks! For providing such a useful information about the Fort.

Reply to  Amit
2 years ago

धन्यवाद !

मुग्धा महेश चौधरी
मुग्धा महेश चौधरी
3 years ago

गडाबद्दल माहिती खूप छान व उपयुक्त आहे. मी कधी अशी गडावर ट्रेकिंग केली नाही पण हा लेख वाचून असा प्रवास करण्याची इच्छा होत आहे.

धन्यवाद !

error: Content is protected !!
4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x